समिधा...
समिधा..
नेहमीप्रमाणे आजही तिन्हीसांज झाली..गाई-गुरे दावणीवरती आली होती.. पाखरं खूप सारा चिवचिवाट करून घरट्याकडे परतत होती; जणूकाही आपली घराकडे जायची वेळ झाली असं ती पिलांना सांगत होती ! सूर्य अस्ताला चालला होता..नदीचा वेगही जणू झुळझुळनार्या वार्यासोबत शांत होत चालला होता! सगळं वातावरण जणू एखाद्या देखाव्याला फिकं पाडेल इतकं प्रसन्न होतं.. पण समिधाच्या आईला मात्र कोणतीतरी रूखरूख लागली होती कारण आज पुन्हा समिधा गुडघ्यात डोकं घालून नेहमीप्रमाणे दरवाजाच्यात बसली होती.. आजही तेच जसं की ती कोणत्यातरी खोल विचारात बुडाली होती.. रोजच्या प्रमाणे आजही ती शांत..स्तब्ध आणि स्थिर राहून दूरवर दिसणार्या अथांग क्षितिजाला न्याहाळत होती..तासंतास ती एकाच जागी बसायची इतकी शांत की तिच्या डोळ्याची पापणीसुध्दा लवत नव्हती..समिधा घरी एकटीच मुलगी ! समुच्या येण्यानं घराला घरपण आलं होतं.. तिचं हसणं बागडणं खेळणं सारं काही त्या चार भिंतींनी अनुभवलं होतं पण आता मोठ्या झालेल्या या समिधाची निशब्द शांतता त्या घराला बघवत नव्हती.. कधी सवयच नव्हती ना त्यांना निशब्द समुची..हसत्या-खेळत्या पोरीच्या असं अचानक शांत होण्याणं आईला त्या चार भिंती खायला उठत होत्या.. आबांनाही त्यांच्या बाहुलीच्या चेहर्यावरच हरवलेलं हसू शोधून सापडत नव्हतं.. डॉक्टर झाले..ताईत-दोरे ही बांधून पाहिले.. कोणी सांगितलं पछाडलय का बघा मग तर मांत्रिक सुध्दा झाले.. पण फरक काहीच नव्हता..रोजचा येणारा दिवस रोज सारखाच मावळत होता..
एक दिवस कंटाळून समिधाच्या आईने हाताच्या फोडाप्रमाणे वाढविलेल्या पोरीवर हातही उचलला.. "का अशी त्रास देतीयेस.. काहीतरी बोलं,असं गप्प राहून काय साध्य करायचंय तुला.. आईच्या खूप सार्या आक्रोशानंतरसुध्दा समिधा शांतच होती.. शेवटी वडिलांनीच तिच्या आईला सावरलं.."पोटचा गोळा आहे..रागाच्या भरात अनर्थ होऊन जाईल" असं सांगून समिधाच्या बाबांनी तिच्या आईला समजावलं..पोरीची जात उगाच आरडाओरडा करून गाव गोळा केलं तर आपलीच बदनामी असा विचार करून समिधाची आईही शांत झाली..
"सटवीने जे लिहिलं आहे ते कोण बदलू शकणार?" असं बोलून पुन्हा ती स्वतःची समजूत घालू लागली.. दिवस नशिबाच्या नावाखाली असेच पुढे चालले होते पण रोजचं चित्र तेच होत..समिधाच्या चेहर्यावर ना हसू ना रडू.. होती ती फक्त निशब्द शांतता.. तिचं असं शांत राहणं दिवसेंदिवस मनाची रूखरूख वाढवत होतं.
एके दिवशी शेजारची अनुसया कामानिमित्त घरी आली होती तिने समिधाची ती अवस्था पाहिली आणि प्रश्र्न करू लागली.. शेवटी समिधाच्या आईने खरी परिस्थिती सांगितली तेव्हा तिने एका शहरातल्या डॉक्टरचा पत्ता दिला आणि तिला उपचारासाठी तिकडे नेण्याच सुचवले. शहरातले डॉक्टर म्हणजे खूप सार्या पैशांची जुळणी करावी लागणार होती.. पण त्या आईवडिलांसाठी एकुलत्या एक मुलीच्या आनंदापुढे पैशांची किंमत काहीच नव्हती.. अगदी २-३ दिवसांत समिधाच्या आई-वडिलांनी पैशांची जमवाजमव केली आणि ते तिला त्या डॉक्टरांकडे घेऊन गेले.. ते एक प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ होते.. त्या डॉक्टरांनी समिधाची परिस्थिती पाहिली आणि तिच्यावरती कोणतातरी मोठा मानसिक आघात झाल्याचं स्पष्ट केलं.. आई-वडिलांना काहीच कळेना..
नेहमी डोळ्यांसमोर असणार्या.. हसत खेळत बागडणार्या समुसोबत असं काय घडलं की तिचं त्या धक्क्यातून सावरण कठीण झालं.. तेव्हा डॉक्टरांनी समिधाच्या उपचारांसाठी काही दिवस तिला हॉस्पिटलमध्येच ठेवण्याची विनंती आई-वडिलांकडे केली.. शिवाय तिची पूर्ण काळजी घेतली जाईल असं आश्वासन देखील दिलं.मग आई-वडिलांनीसुध्दा आपल्या मुलीच्या भल्यासाठी डॉक्टरांच ऐकायच ठरवलं..समिधाची ट्रिटमेंट सुरू झाली.डॉक्टर तिने काहीतरी बोलावं.. कमीतकमी प्रतिसाद तरी द्यावा यासाठी प्रयत्न करत होते.. त्याच दरम्यान डॉक्टरांचा मुलगा साकेत नुकतीच डिग्री घेऊन विदेशातून मायदेशी आला होता..
एके दिवशी साकेत वडिलांसोबत हॉस्पिटलमध्ये आला असता त्याने समिधाला पाहिलं आणि पाहतंच राहिला.. समिधा दिसायला खूप सुंदर होती.. लांब सोनेरी केस.. हिरमुसलेले पण बोलके डोळे.. धारधार नाक आणि गोरा रंग.. असं हे तिच रुप डॉ.साकेतला भुलवून टाकणारं होतं.. त्याने तात्काळ वडिलांना तिच्याविषयी विचारलं.. समिधा विषयी सगळी माहिती घेतली आणि शेवटी ही केस मी हॅन्डल करू का विचारलं.. साकेतला अजून एवढा अनुभव नव्हता शिवाय समिधा ची केस खूप काळजीपूर्वक इलाज करण्याची होती,त्यामुळे थोडा वेळ नाही-हो झालं पण शेवटी साकेतने वडिलांना मनवलं.. आणि समिधाची जबाबदारी स्वतःवर घेतली.. तो समिधाच्या खोलीत गेला..थोडा वेळ तिच्याकडे एकटक बघत राहिला.. त्याला जाणवलं समिधा सगळं पाहतेय.. तिला माहितीय तिच्या आजूबाजूला काय होतंय तिला सगळं समजतंय पण तिचा ब्रेन कोणतीच गोष्ट अॅक्सेप्ट करत नाहिये.. यावरून त्याला अंदाज आला ती नक्कीच कोणत्यातरी भयानक धक्क्यातून सावरु शकत नाहिये.. आणि तो समजून गेला,तिच्या वेदनांना संवेदनांमध्ये बदलण्यासाठी पुन्हा तिच्यासमोर तिचं आनंदी आयुष्य उभा करायला हवं.. त्यासाठी समिधाच्या नवीन आयुष्याची सुरुवात करावी लागणार होती..
तो तिथून थेट तिच्या आईकडे गेला.. त्याने समिधाच्या सगळ्या आवडीनिवडी जाणून घेतल्या आणि एका सकारात्मक नजरेनेसोबत एक प्रेमळ स्मितहास्य घेऊन तो तिच्या खोलीत परतला.. समिधा बेडवर नव्हती.. तो थोडासा कासावीस झाला तोच त्याला समिधा गॅलरीत आकाशाकडे पाहत बसलेली दिसली..तो धावत तिच्याजवळ गेला त्याच्या एका हातात खूप सारे चाॅकलेटस् आणि दुसर्या हातात एक क्यूटसा टेडी होता...तो काहिश्या एक्सिईटमेटमध्ये एका लहानमुलाप्रमाणे तिच्या बाजूला टेडीला घेऊन उड्या मारू लागला.. पाठिमागे लपवलेला चॉकलेटचा हात तिच्यासमोर केला त्याला वाटत होतं चॉकलेट्स बघून काहीतरी रिअॅक्ट करेल..पण रिझल्ट शुन्य होता.. समिधाची पापणी सुध्दा लवली नव्हती साकेत हताश झाला पण त्याला एक गोष्ट लक्षात आली जर समिधा चाॅकलेटस् इग्नोअर करतेय तर नक्कीच तिच हसणं ज्या गोष्टीसाठी गमावलं ती गोष्ट खूप किमती असेल कारण समिधाच्या आईने सांगितलं होतं चॉकलेट्स आणि टेडी साठी ती काहीही करू शकते..इतके ते तिला आवडतात.पुढे त्याने पाहिलं तर ती आकाशातील तारे न्याहाळत होती जणू ते तिचे सगळ्यात जवळचे आहेत.. साकेतला कळून चुकलं होतं की "रोज कोणत्यातरी यज्ञात समिधा स्वत:ची आहुती देत होती!"
साकेतचा पहिला प्रयत्न असफल ठरला होता..त्याने हळुवार तिच्या खांद्यावर हात ठेवले आणि तिला बेडच्या दिशेला वळवलं.. आणि तिला नर्सच्या स्वाधिन करून तो तिथून निघाला..त्या रात्री त्याला काही झोप लागली नाही.. सकाळी उठून तो समिधाच्या गावी गेला.. तिथे त्याला तिची diary सापडली ज्यात त्याला तिची bucket list भेटली.. तो तिच्या काॅलेजमध्ये गेला तिच्या मैत्रिणींना भेटला आणि तिथेच साकेतला त्याच्या सगळ्या प्रश्र्नांची उत्तरं भेटली... आता सगळे प्रश्र्न सुटले होते..आता शंका-कुशंकांच घर मोडून पडलं होतं.. पण सत्य समजल्यानंतर समीधाला एकटीला सोडून जाणं काही त्याच्या तत्वात बसणारं नव्हतं!! ज्या समिधा सोबत तो भविष्याची स्वप्न बघू लागला होता तिचा भूतकाळ काहीसा वेगळा होता.. तिच्या आयुष्यातला साकेत कोणी वेगळाच होता.. हो!! समिधाला कोणी दुसरा मुलगा आवडायचा..साकेतला तिच्या मैत्रिणींने समिधाचा भूतकाळ सांगायला सुरूवात केली तसतसं साकेतच्या पायाखालची जमीन सरकत होती.. हो समिधाच लग्नं तर लहानपणीच ठरलं होतं ; हां म्हणजे झालं असं..
समिधा आणि शशांक जेमतेम १० वर्षांचे असतील..अगदी जीवलग मित्र-मैत्रिण म्हणावं तरी काही हरकत नाही.. शाळेत सुध्दा दोघे सोबत यायचे-जायचे.. शिवाय घरचे संबंध अगदी चांगले.. एकदा असंच एका family function मध्ये शंशाकचे आजोबा समिधाच्या बाबांना बोलले.."काय रे केशव,तुझी मुलगी माझ्या नातवाला देशील काय?" तेव्हा मस्करी समजून समिधा चे बाबा हो बोलून गेले..आणि बोलता बोलता वचन दिलं आणि काही दिवसांत ते ही एक मस्करीच समजून विसरून देखील गेले..पण ही गोष्ट समिधा आणि शशांकच्या मनात जशीच्या तशी कोरली गेली.. काहीच समज नसलेली ही मुलं आपण आयुष्यभर कधीच वेगळे होणार नाही या आनंदाने भारावून गेली.. आजोबा समुला नेहमी सूनबाई म्हणूनच हाक मारायचे मग तिथून सुरूवात झाली त्यांच्या अतूट मैत्रिची.. पुढे जाऊन आपण एकमेकांचे जीवनसाथी होणार हाच विचार डोक्यात ठेवून ते दोघेही मोठे होत होते.. काही दिवसांनी आजोबा हे जग सोडून निघून गेले आणि आता त्यांच्या नात्यांचं अस्तित्व टिकवणारी त्या दोघांशिवाय दुसरी कोणतीच व्यक्ती या जगात नव्हती.. काही दिवसांनी शशांकच्या बाबांचं पोस्टींग मध्यप्रदेशला झालं ते नेहमीसाठी तिकडे रहायला गेले..जाताना "मी नक्की परत येईन फक्त तू कधीच माघार घेऊ नको!" असं वचन देऊन शशांकही तिथून निघाला." आणि तिथून सुरू झाली आयुष्याची खरी लढाई.. समिधाला शशांकची खूप सवय झाली होती.. खेळण्या-बागडण्यापासून..अभ्यासापर्यंत! हळूहळू ती सुराला लागली.. कित्येक वर्षे उलटली.. जोमाने अभ्यास करून समिधा युनिव्हर्सिटीत टॉप आली.. आता घरचे लग्नासाठी बघायला सुरू करणार होते हे तिला कळून चुकलं होतं..म्हणूनच आता तिचे डोळे शशांकच्या वाटेकडे लागले होते..इतक्या वर्षांत एकदाही त्याची भेट झाली नव्हती तरीही तो येईल अशी आस समिधाला होती!नंतर सोशल मिडियामुळे पुन्हा त्यांची भेट झाली.. आणि समिधाला काहीसा दिलासाच भेटला.. शशांकच स्वप्नसुध्दा पूर्ण झालं होतं.. अर्थातच त्याच्या बाबांसोबत तो देखिल आर्मीमध्ये भरती झाला होता..त्यांचं आता पुन्हा बोलणं होऊ लागलं..तिला भिती वाटायची शशांक बदलला तर नसेल ना पण शशांक सुध्दा समिधाप्रमाणेच त्याच्या वचनाशी एकनिष्ठ होता... तिने त्याला सांगितलं घरचे तिच्या लग्नासाठी बघायला सुरुवात करणार आहेत.. शशांकच्या घरच्यांना शशांक-समिधाच्या नात्याविषयी पूर्ण कल्पना होती..त्यांची पूर्ण संमती होती.. आणि शशांक एक गुणी मुलगा असल्यामुळे आणि शिवाय दोघांचेही वडिल जिगरी मित्र असल्यामुळे समिधाचे घरचे नाही म्हणणार नाहीत याची दोघांनाही खात्री होती..पण आता प्रश्र्न होता समिधाच्या आई-बाबांना ही गोष्ट कोण सांगेल? तितक्यात शशांकने तिला सांगितलं, काही दिवसांतच तो त्याच्या आई-बाबांना सोबत समिधाच्या घरी बोलणीसाठी येणार आहे!... समिधाचा आनंद गगनात मावेनासा झाला,एका जवानाची पत्नी यापेक्षा मोठं भाग्य काही असू शकतं का?
सगळं काही सुरळीत सुरू होतं.. इतक्या वर्षांत दोघांची एकदाही भेट झाली नव्हती तरीही त्यांच त्या वचनाशी एकनिष्ठ असणं,आणि निस्वार्थ नातं निभावणं त्यांच्या खर्या प्रेमाची साक्ष देणारं होतं!
अखेर तो दिवस आला जेव्हा शशांक समीधाच्या घरच्यांना भेटायला येणार होता..तो दुसऱ्याच दिवशी घरी यायला निघणार होता.. आणि त्या रात्री त्यांच्या ट्रुपवरती दहशतवादी हल्ला झाला ज्यामध्ये शशांकला त्याचे प्राण गमवावे लागले.. समिधाला याविषयी काहीच माहिती नव्हती.. दुसर्यादिवशी तिने त्याची खूप वाट पाहिली पण तो काही आलाच नाही..तिला खूप वाईट वाटलं! तोच तिने सोशल मिडियावरती न्युज पाहीली आणि ती तिची सगळी स्वप्न तिथेच उध्वस्त झाली.. सगळं काही सुरू होण्याआधीच संपलं होतं.. ती त्या दिवसापासून शांत..स्तब्ध आणि स्थिर झाली होती हे साकेतला कळून चुकलं होतं..त्याने घडला प्रकार समिधाच्या घरच्यांना सांगितला आणि तो त्यांना घेऊन परत आला..
आज साकेत समिधा समोर जाताना काहीसा चाचपडत होता.. कारण तो ज्या मुलीला आपलं मानू लागला होता..ती कधीच त्याची नव्हती.. आणि आजही ती मनाने शशांकचीच होती.. साकेत तिच्यासमोर गेला आणि तो फक्त
एवढंच बोलला.. "समिधा, असं काहीच न खाता न पिता.. शांत राहून शशांक परत येणार नाहिये.." आणि त्यांच क्षणी तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले..साकेतला समजलं समिधा प्रतिसाद देतेय..तसा तो पुढे बोलू लागला.."तुला तुझ्या आई-वडिलांसाठी पुन्हा उभा रहावं लागेल! असे आकाशातील तारे न्याहाळून हरवलेली माणसं परत येत नसतात समिधा.." आणखी बराच वेळ त्याने तिला सत्य परिस्थितीच्या जाणिवा करून दिल्या तोच ती मोठ-मोठ्याने रडू लागली. समिधा हाॅस्पिटलमध्ये असताना तिच्या घरच्यांना शशांकच्या आईवडिलांचे कुरिअर भेटलं होतं ज्यात शशांकच्या टेन्टमधील काही सामान होतं..त्यात पुसट झालेला समिधा-शशांकचा लहानपणीचा फोटो होता.. शिवाय तिने लहानपणी शशांकसाठी लिहिलेलं तिच्या हस्ताक्षरातील पत्रही त्याने सांभाळून ठेवलं होतं..हे बघून तिला आणखी रडू कोसळलं! तिने शेजारी असलेल्या आईला मिठी मारली आणि रडू लागली..आईवडिल दोघेही तिचे सांत्वन करू लागले..आता समिधा तिच्या निशब्दतेतून बाहेर आली आहे असं समजून तिला तिच्या आईवडिलांकडे सोपवून साकेत खोलीबाहेर पडत होता..तोच समिधाने त्याला थांबवलं आणि त्यांचे आभार मानले..आणि शशांकच्या आई-बाबांना आपल्या घरी घेऊन येऊ..त्यांच वय झालं आहे त्यांना दुसरं कोणीच नाही.. "मी शशांकला वचन दिलंय..आता मला माघार घेऊन चालणार नाही.. इथून पुढे त्यांना सांभाळणं माझी जबाबदारी आहे" आपण त्यांना घेऊन येऊ अशी विनवणी तिने केली! नुकत्याच बर्या झालेल्या समुचा हिरमूस नको म्हणून तिच्या आई-वडिलांनी देखील हे मान्य केलं! शिवाय मी त्यांना घेऊन येईन असं साकेतने तिला वचनही दिलं..आणि ते सगळे घरी आले..दुसर्या दिवशी साकेतही शशांकच्या आई-वडिलांना घेऊन आला..एकदा शशांकने समुसाठी आणलेली भेटवस्तू त्यांनी तिला दिली..आणि तिला स्वत:ची मुलगी समजून पुन्हा नव्याने सुरूवात केली.. सगळं काही सुरळीत होत आल्याचं पाहून साकेतने तिथून निघायचं ठरवलं.. साकेतला समिधा आवडते हे तिला माहीती होतं.. तरीही तिने ते कधीच माहिती असल्याचं भासू दिलं नाही.. सगळ्यांना पुन्हा आनंदी बघून.. साकेत डोळ्यांतले अश्रू लपवत तिथून निघाला! आणि समिधाची डायरी तिला परत करत असताना तो तिला बोलला.. bucket list पूर्ण करताना जर कधी माझी गरज वाटली तर नक्की आवाज देशिल..मी एक मित्र म्हणून नेहमी तुझ्या मदतीला तयार आहे!" साकेतच्या मनाचा मोठेपणा बघून समिधाच मन भरून आलं तिने."नक्कीच" असं प्रतित्युर करत त्याचा निरोप घेतला..
-ऋतुजा गुरव..📝✨
खूपच योग्य आणि मार्मिक शब्दात ही कथा लिहिली आहे खूप आवडली मला काळजाला भिडली
ReplyDeleteKhup mst lihly😐😶😢
ReplyDeleteApratim...kharter sabad nahit yevdh niswarth prem pan shevti..ak hota hota rahil
ReplyDelete