एक शिकवण अशीही..
इलेक्शनच ट्रेनिंग उरकून रूमवर जायला निघाले होते. खूप जास्त भूक लागलेली काहीतरी खाऊन जाऊ विचार केला पण चांगलं असं आजूबाजूला काही दिसलंच नाही. मग म्हंटलं रूमलाच जाऊन काहीतरी खाऊ. पाहिलं तर २०-२५ मि. चा रस्ता. आधी बससाठी थांबले.. नंतर पाहिलं की बसला खूप गर्दी होती मग रिक्षाकडे वळाले तेव्हा एक रिक्षावाला थांबलेला दिसला त्यांनी विचारले कुठे जायचं मी पत्ता सांगितला..
रिक्षावाला - या बसा..
मी- किती घेणार?
रिक्षावाला- किती द्याल ?
मी- 30 रुपये घेतात, मी तेवढेच देईन..
रिक्षावाला - एवढ्या मध्ये नाही होणार.
मी- ठीक आहे राहू दे..मी दुसरी रिक्षा बघते.
रिक्षावाला- ( काहीसे नाराज होऊन)..बसा..तेव्हा ते स्वतः सोबत काहीतरी पुटपुटताना दिसले..मी लक्ष दिले नाही..वय असेल ७०-७२ च्या आसपास..हात थरथरणारे..शरीर एकदम थकलेलं.. चष्मा धाग्याने बांधलेला.. नंतर पुन्हा थोडा वेळ ते पैशाचा विचार करून थोडे जास्ती देता का विचारपूस करत होते तोवर त्यांना आणखी एक पॅसेंजर मिळाला मग आम्हा दोन प्रवाशांना घेऊन रिक्षा निघाली.. बरं झालं म्हंटलं आजोबांचा तोटा पण होणार नाही.. आपण पण वेळेत पोहचू.. तेवढ्यात मला समजलं की हे आजोबा रिक्षा खूपच स्लो चालवतायत, मला वाटलं की ट्राफिकमुळे स्लो चालवत असतील पण थोडं अंतर पुढे गेल्यानंतर रस्ता रिकामा होता तरीसुद्धा रिक्षाची गती काही वाढत नव्हती.. पाठीमागून येणारी सगळी वाहनं पुढे जाताना दिसत होती पण आमची रिक्षा मात्र एकदम स्लो.. खूप राग येऊ लागला काय दुर्बुद्धी आणि मी या रिक्षा मध्ये बसले.भुकेमुळे जास्तच संताप होऊ लागला..आता दुसरा उपाय नाही म्हणून शांतच बसले..थोडावेळ रिक्षाला न्याहाळलं..गंज चढलेली, सगळे पार्ट सैल झालेली, मधेच दचके खाणारी ती रिक्षा होती एवढंच काय तर सायलेन्सर मधून बाहेर पडणारा धूर हवेसोबत आतमध्ये येत होता. तेव्हाच मी समजून गेले रिक्षासुध्दा आजोबांसारखी थकलेली दिसतेय. एव्हाना हे दृश्य पाहून माझा राग निवळत चालला होता..पण माझ्या सोबतचा प्रवासी मात्र वैतागून त्या आजोबांना किती हळू गाडी चालवता म्हणून कुरकुर करत होता.. तरी आजोबांनी प्रत्युत्तर दिलं नाही.. माझ्या डोक्यात विचारचक्र फिरू लागले.. यांच्यावर या वयात पण काम करायची वेळ का बरं आली असेल ? यांची मुलं यांना सांभाळत नसतील का? त्यांचे थरथरणारे हात पाहून मनोमनी ठरवलं की उतरताना त्यांना सांगू.. बाबा, हे काम नका करू.. इच्छा असेलच तर काही बैठे काम करा... तोवर सोबतचा प्रवासी मोठ्याने ओरडला अरे बाबा किती हळू गाडी चालवतो.. स्पीड वाढव ना.. तेव्हा बाबा बोलले.. "आमची मुलं गेली एक्सिडंटमधे.. आता आम्हाला कोणीच नाही.. आम्ही दोघेच." म्हणून गाडी हळू चालवतो. त्यांच्या या एका वाक्यात खूप सारी खिन्नता होती. तिथे मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. निशब्द शांतता पसरली.. माझा स्टॉप आला..२०मि चा रस्ता ४० मि ने संपला होता..मी उतरले.. बहुदा त्यांना आणखी काही सांगायचं होतं, मला ही ऐकू वाटलं पण मी माझ्या कुतुहलतेला आवरलं.. ठरल्यापेक्षा जास्त पैसे देऊन मी पुढे निघाले..त्यांनी आवाज दिला.. दिदी.." ते ठेवा तुम्हाला." एवढं बोलून..मी तिथून निघाले.
आयुष्याने यातून आज एक धडा शिकवला, जगणं सगळ्यांसाठी सारखं नाही. कुणी पिढीजात संपत्तीत जन्माला येतो तर कुणी अठरा विश्व दारिद्र्यात. लोकं माप म्हणतात, तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर त्यात तुमचा दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर नक्कीच तुमचा दोष आहे. पण दारिद्र्याची ती दरी मिटवायला एखाद्या गरिबाला किती खस्ता खाव्या लागतात याचं वर्णन आपण शब्दांत नाही करू शकत. एखाद्याला जेव्हा आख्खी हयात कष्टात घालवून देखील शेवटच्या श्वासापर्यंत पोटासाठी संघर्ष करावा लागतो तेव्हा आयुष्य कुठेतरी बेईमान वाटतं. असं म्हणतात आपण एखाद्याच्या चपला घालू शकतो पण त्यांचा रस्ता आपण चालू शकत नाही. शेवटी ज्याचं त्याचं दुःख ज्याच्या-त्याच्या वाट्याला. पण आपण आपल्या परीने जगणं सुंदर बनवायचा प्रयत्न करू शकतो.भगवंताने वाट्याला सुख दिलंच तर समाधानी रहावं. जमलंच तर आजुबाजुच्यांना सुखदुःखात साथ द्यावी... जसं दत्ता हलसगीकर म्हणतातचं ना,
"ज्यांची बाग फुलून आली,
त्यांनी दोन फुले द्यावीत..
ज्यांचे सूर जुळून आले,
त्यांनी दोन गाणी द्यावीत...
सूर्यकुलाशी ज्यांचे नाते
त्यांनी थोडा उजेड द्यावा..
युगायुगांचा अंधार जेथे,
पहाटेचा गाव न्यावा....
ज्यांच्या अंगणी ढग झुकले,
त्यांनी ओंजळ पाणी द्यावे..
आपले श्रीमंत हृदय त्यांनी,
रिते करून भरून घ्यावे....
आभाळाएवढी ज्यांची उंची
त्यांनी थोडेसे खाली यावे..
मातीत ज्यांचे जन्म मळले,
त्यांना उचलून वरती घ्यावे ..."
- ऋतुजा 🌸
Wow.... रात्री तू संगीतलेच होते सगळे तरी पण म्हंटले वाचून तरी पाहू.... काल पेक्षा जास्त ठळकपणे दृष्य डोळ्या समोर उभे राहिले... कमाल लिहिलेस..🔥👍
ReplyDelete